
सध्या अनेक जण फिरायला जाण्याचे प्लॅन बनवत आहेत. ट्रिपला तुमच्या लाडक्या मनीला सोबत घेऊन जाण्याचा विचार करताय? मग नियोजन कसं करावं, याबद्दल वाचा…
००००
मुंबई टाइम्स टीम
ट्रिपला जाताना पाळीव दोस्तांना सोबत घेऊन जाण्याचा ट्रेंड रुळतोय. मांजरीला गाडीची सवय होण्याकरिता काय करायला हवं? प्रवासात कशी काळजी घ्यावी? याविषयी आपण जाणून घेऊ या…
० प्रवासाला जाण्याआधी…
तुम्ही एक-दोन दिवसांसाठी जवळच्या ठिकाणी जाणार असाल तर ठीक आहे. पण, तुम्ही लांबचा प्रवास करणार असाल तर त्याआधी मांजरीचं लसीकरण करणं गरजेचं आहे. तसंच तुम्ही ज्या ठिकाणी जाणार असाल त्या ठिकाणचं हवामान, जीवनशैली या सर्व घटकांची माहिती तुमच्या पशुवैद्यांना द्या. त्या अनुषंगाने डॉक्टर औषधं किंवा लसीकरण करतील. मुख्य म्हणजे या परिस्थितीत तुमच्या मांजरीची रोगप्रतिकार शक्ती देखील महत्त्वाची भूमिका बजावते. तसंच तुम्ही जर एखाद्या नवीन राज्यात जाणार असाल तर तुम्ही तुमच्या पशुवैद्यांकडून मनीची आरोग्याविषयक कागदपत्रं घ्या.
० गाडीतून प्रवास करताना…
तुम्ही जर लांबच्या प्रवासाला जाणार असाल आणि तुमच्या लाडकीची गाडीतून प्रवास करण्याची पहिलीच वेळ असेल तर प्रवास त्रासदायक ठरू शकतो. तिला गाडीची सवय व्हावी म्हणून रोज थोड्या वेळासाठी गाडीत बसवा, असं प्रशिक्षक सलोमी गुप्ता सांगतात. मनीला गाडीत ठेवा आणि दार लावून घ्या. तिचं निरीक्षण करा. प्रवासाला जायच्या आधी असं रोज करत जा. तसंच लांबच्या प्रवासाला जाताना काही वेळानंतर १०-१५ मिनिटांचा ब्रेक घ्या. यावेळेत तुम्ही मांजरीला फेरफटका मारून आणा. प्रवास करण्याआधी शेपूटवाल्या मैत्रिणीला खूप खायला घालणं टाळा, असं तज्ज्ञ सांगतात. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री दिपना पटेलने पाच वर्षाच्या मिलोसह (मांजर) प्रवास केला. त्या अनुभवाबद्दल ती सांगते की, ‘आम्ही शक्यतो सूर्यास्तानंतरच प्रवास करतो. जेणेकरून, मिलोचा प्रवास सुखकर होईल’. प्रवासादरम्यान मांजरीला अस्वस्थ वाटत आहे असं जाणवल्यास तिला कॅरिअरमध्ये ठेवलं जातं, असं दिपना सांगते.
० करोना आणि प्रवास
करोना संकटाच्या आधी शेपूटवाल्यांना घेऊन प्रवास करणं तितकंसं अवघड नव्हतं. पण, कोव्हिड पश्चात प्रवासाला जाताना नियोजन करून बाहेर पडणं गरजेचं झालं आहे. अभिनेत्री सुबुही जोशीने चार पायांच्या मित्राला सोबत घेऊन मुंबई-लोणावळा प्रवास केला. पण, बाहेरचं खाणं कटाक्षानं टाळलं. त्यामुळे प्रवास करताना खाण्याच्या गोष्टी जास्त प्रमाणात घ्या असं ती आवर्जून सांगते. कॉमेडियन मनन देसाईने सात महिन्याच्या मिलीसोबत प्रवास केला. प्रवासाचा कालावधी चार तासांचा असल्याने मिलीला पिण्याचं पाणी देण्यासाठी बाटलीचा वापर केला होता, असं तो सांगतो.
० हॉटेलमध्ये राहताय?
तुम्ही प्रवास करुन घरी येणार असाल तर प्रश्नच नाही. पण, तुम्ही हॉटेलमध्ये थांबणार असाल तर मांजरीचा विचार करुन जागा निवडा. मांजरीची खेळणी किंवा ज्यावर ते झोपतात ते तुमच्या सोबत प्रवासादरम्यान न्या. मुख्य म्हणजे बाहेर गेलात तरी त्यांच्या खाण्यापिण्याच्या वेळा चुकवू नका. तुम्ही जवळच्या अंतरावर फेरफटका मारायला जाणार असाल तर मांजरीला देखील घेऊन जाऊ शकता. पण, तुम्हाला घरी परतण्यास उशीर होणार असेल तर त्यांच्यासाठी एका बाऊलमध्ये खाऊ आणि दुसऱ्या बाऊलमध्ये पाणी ठेवून मग बाहेर जा.
० टिप्स
– मांजरीला सीट बेल्ट लावणं आवश्यक आहे.
– चादरी मुबकल प्रमाणात घ्या.
– गाडीतील आणि बाहेरील तापमानात फरक असल्यास त्याचा परिणाम मांजरीच्या तब्येतीवर होऊ शकतो. त्यानुसार काळजी घ्या.
– प्रवासादरम्यान सॅनिटायझर, प्रथमोपचार पेटी, वेट वाइप्स, पिइंग पॅड्स बरोबर ठेवा.
– तुमच्याकडे पशुवैद्य किंवा प्राणीप्रेमींचे नंबर असू द्या.
संकलन- वेदांगी काण्णव, मुंबई विद्यापीठ
Post a Comment
You must be logged in to post a comment.