
सतत बदलणाऱ्या हवामानाचे गंभीर परिणाम प्राण्यांवर होत आहेत. सर्दी आणि पोटाच्या विकारांनी त्रस्त असलेल्या पाळीव दोस्तांचं प्रमाण वाढत आहे. अशा परिस्थितीत त्यांची काळजी कशी घ्यावी? याबाबत जाणून घ्या.
००००
मुंबई टाइम्स टीम
कधी थंडी तर कधी पाऊस पडत असल्यामुळे आरोग्यविषयक समस्या डोकं वर काढू लागल्या आहेत. बदलणाऱ्या हवामानाचा तुम्हाला इतका त्रास होत असेल तर पाळीव दोस्तांचं काय होत असेल? याचा विचार करायला हवा. हवामानातील बदलांचा शेपूटवाल्या दोस्तांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होत असतो, हे लक्षात असू द्या. एक जबाबदार पालक म्हणून पेट्सची सर्वतोपरी काळजी घेणं आवश्यक आहे.
सध्याच्या वातावरणामुळे सर्दी, जुलाब, उलट्या किंवा पोटदुखीचा त्रास डोकं वर काढू शकतो. त्यात प्राण्यांना बोलता येत नसल्यामुळे नेमकं काय होतंय हे ते सांगू शकत नाहीत. यासाठी पालकांनी त्यांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवायला हवं. काही लक्षणं आढळून आल्यास त्वरीत पशुवैद्यांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. याशिवाय, खबरदारीच्या उपायांचा अवलंब करावा, असा सल्ला तज्ज्ञ देतात.
स्वच्छता महत्त्वाची
सतत बदलणाऱ्या वातावरणामुळे होणारा त्रास टाळायचा असेल तर स्वच्छता राखणं अत्यंत गरजेचं आहे. घरात येणाऱ्या धूलिकणांचा तुम्हाला त्रास होतो. त्याप्रमाणे घरातल्या पाळीव दोस्तांच्या आरोग्याचं नुकसान होत असतं. त्यामुळे खबरदारी घेणं आवश्यक आहे. घर स्वच्छ असावं. विशेषत: शेपूटवाल्या दोस्तांचा वावर असतो ते ठिकाण स्वच्छ असावं. त्यांचे कपडे आणि भांडी धुतलेली असावीत. तसंच पिण्यासाठी स्वच्छ पाणी द्यावं. चार पायांचे दोस्त बाहेरुन घरी आल्यावर त्यांचे पाय स्वच्छ धुवा.
प्रवास करताय?
तुमच्या आजारी शेपूटवाल्या दोस्ताला घेऊन प्रवास करताय? मग अधिक खबरदारी घेणं आवश्यक आहे. नवीन ठिकाणी असलेल्या हवामानाचा त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रवास सुरु करण्याआधी पशुवैद्यांचा सल्ला घ्यावा आणि आवश्यक ती सर्व औषधं जवळ बाळगावीत.
टिप्स
– एखादी फेरी मारण्यासाठी बाहेर घेऊन जाऊ शकता. पण, त्यांना घेऊन जास्त वेळ बाहेर फिरु नका.
– सध्या मध्येच पाऊस पडतोय. त्यामुळे पाणी साचलेल्या ठिकाणी फिरायला जाऊ नका.
– बाहेर गेल्यावर रस्त्यावरचं काही खात नाहीत ना याकडे बारीक लक्ष असू द्या.
– बाहेरुन घरी आल्यावर शेपूटवाल्या दोस्तांचे पाय स्वच्छ धुवा.
– जुलाब किंवा उलट्या होत असतील तर तातडीनं पशुवैद्यांचा सल्ला घ्या.
– सद्यस्थितीत कुत्र्यांना सर्दी होत असल्याचं निदर्शनास आलं आहे. त्यामुळे पशुवैद्यांना दाखवून औषधं घ्या.
– दिवसभर लागणारं पिण्याचं पाणी एकदाच काढून ठेवू नका. थोड्या-थोड्या प्रमाणात पाणी प्यायला द्या. बराच वेळ पाणी न प्यायल्यास ते फेकून द्या आणि शुद्ध पाणी पिण्यास द्या.
– घरातील पाळीव दोस्तांचा कोपरा स्वच्छ असावा. तिथं हवा खेळती असावी. विशेष म्हणजे डासांचा त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी.
– अचानक तापमान वाढल्यावर आपली जशी चिडचिड होते तशी चार पायांच्या दोस्तांचीही होत असते. अशा वेळी त्यांना समजून घ्यावं.
– गरम होतंय म्हणून थंड खायला किंवा प्यायला देऊ नका. कारण सध्याच्या वातावरणामुळे घश्याचा संसर्ग होऊ शकतो.
– आजूबाजूच्या वातावरणाचा पाळीव दोस्तांच्या मानसिकतेवर परिणाम होत असेल तर वेळीच काळजी घ्या. गरज भासल्यास पशुवैद्यांचा सल्ला घ्या.
– वेळात वेळ काढून शेपूटवाल्यांसह खेळा.
००००
सध्या हवामानात सतत बदल होत आहेत. अशा परिस्थितीत सर्दी आणि पोटाचे आजार दिसून येतात. बाहेर फिरुन आल्यानंतर शेपूटवाल्या दोस्तांचे पाय स्वच्छ धुवा. जमिनीवर पडलेलं खाऊ देऊ नका. थंडीच्या मोसमात केसगळती होत नाही. पण, बदलत्या हवामानामुळे केसगळतीची समस्या दिसून येत आहे. घश्याचा संसर्ग होण्याची शकता नाकारता येत नाही. वेळोवेळी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
– डॉ. शिवानी तांडेल, पशुवैद्य
Post a Comment
You must be logged in to post a comment.