
लहान मुलांप्रमाणे घरातले शेपूटवालेसुद्धा हट्ट करतात. अमुक पदार्थच खायला हवा, असं अडून बसतात. तुमच्या घरातली मनीमाऊसुद्धा हट्ट करते? अशा वेळी त्यांना कसं सांभाळावं, याविषयी…
००००
डॉ. उमेश कल्लहळ्ळी
तुम्हाला जर तुमच्या शेपूटवाल्यासोबत खास नातं निर्माण करायचं असेल तर त्याच्यासोबत वेळ घालवून त्याच्या स्वभावाचा अंदाज घ्या. तुमच्याशी खेळण्यासाठी प्रयत्न करतील असतील तर खेळा. अशा प्रकारे सांभाळ करताना मांजरीच्या कुठल्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात आणि कुठल्या गोष्टी करणं टाळावं याविषयी जाणून घेऊ या…
० समतोल आहार महत्त्वाचा
मांजरांविषयी सांगायचं झालं तर त्या कुत्र्यांपेक्षा खूप आरामदायी जीवन जगतात. एकंदर हालचालीचं प्रमाण खूप कमी असतं. त्यामुळे त्यांना खायला देताना देखील कमी कॅलरीयुक्त द्यायला हवं. शक्यतो प्रथिनांचं प्रमाण जास्त असेल असं पाहा. मांजर किंवा पिल्लांना जे काही खायला द्याल त्यात समतोल साधणं महत्त्वाचं आहे.
० वेळ पाहून संधी साधा
दिवसातला एक तास तरी मांजरींसोबत खेळा. मुख्य म्हणजे त्यांचा शारीरिक आणि मानसिक व्यायाम होईल अशा प्रकारचे खेळ निवडा. खेळताना त्यांच्या देहबोलीकडे लक्ष द्या. तुम्ही मित्र-मैत्रिणीकडे जाणार असाल किंवा ते घरी येणार असल्यास त्यांना बंद करून न ठेवता त्यांच्याशी खेळू द्या. त्यांच्याकडे मांजरी असतील तर त्यांच्याशी ओळख करून द्या. खेळताना त्यांना आवडत नसलेला एखादा पदार्थ किंवा औषधही देऊ शकता. त्यावेळी तुमचं ऐकलं तर त्यांचं कौतुक करा.
० सल्ला घ्या
आहार या घटकाला देखील अनन्यसाधारण महत्त्व आहे. मांजरी कमी हालचाली करतात, म्हणून त्यांच्या आहाराकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यांच्या आहारातील पदार्थांचा समतोल साधणं गरजेचं आहे. त्यांच्या आहारात प्रथिनांसोबत खनिजं आणि जीवनसत्व यांचा समावेश असायला हवा. तसंच त्यांना स्वच्छ पाणी देखील द्यायला हवं. आज अनेक जण मांजरींना विशेष खाद्य देतात. पण, ते प्रत्येक मांजरीला पचेल असं नाही. त्यामुळे तुमच्या पशुवैद्यांचा सल्ला घेऊन त्यांना खाऊ द्या. मुख्य म्हणजे त्यांना कोरडा खाऊ देणं टाळा. खाणं थोडंसं ओलसर असेल याकडे लक्ष द्या.
० स्वछता ठेवा
घरात शेटपूटवाले दोस्त असतील तर घरासोबतच त्यांची स्वच्छता राखणं तितकंच गरजेचं आहे. मांजरीचे केस पडू नये, म्हणून दिवसभातून किमान दोनदा तरी त्यांचे केस विंचरा. त्यांची नखं वेळच्या वेळी कापा. विशिष्ट ठिकाणी नैसर्गिक विधी करण्याची सवय लावा.
० विकार होऊ शकतात
तुम्ही जर तुमच्या मांजरीला बदल किंवा ट्रीट म्हणून रोजच्या पदार्थापेक्षा काही वेगळं देणार असाल तर विचार करून निवड करा. मनुके, चॉकलेट, कांदा असे पदार्थ दिल्याने त्यांना पोटचे विकार किंवा अन्य काही आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे त्यांना पचायला हलकं असं काही तरी द्यायला हवं.
० अतिरेक नकोच
तुम्ही दिलेली एखादी गोष्ट मांजरींना आवडली तर ती परत मागतील. पण, त्या गोष्टीचा जास्त प्रमाणात सेवन केल्यानं त्यांना जर काही अपाय होणार असेल तर ती गोष्ट देणं प्रामुख्यानं टाळा. महिन्यातून एकदा-दोनदा दिलं तर ठीक आहे. तुम्ही सांगितलेलं ऐकत नसतील, खूप हट्ट करत असतील किंवा अगदी केविलवाणा चेहरा केला तरी ती गोष्ट देऊ नका. हट्ट केल्यावर सगळं मिळतं, असा समज होता कामा नये. दुसऱ्या एखाद्या कृतीसाठी त्यांचं कौतुक करून त्यासाठी बक्षीस द्या.
० खाऊ असावा हलका
तुम्ही तुमच्या मांजरींना कडक गोष्टी देणं कटाक्षानं टाळा. टणक पदार्थ खाल्ल्यामुळे त्यांच्या दातांना इजा होण्याची भीती नाकारता येत नाही. त्याच सोबत आतडे आणि पोटाच्या विकारांना बळी देखील पडू शकतात. त्यामुळे त्यांना स्पेशल ट्रीट देताना देखील चावायला सोपं आणि पचायला हलकं असं काही तरी पौष्टिक द्यायला हवं. तुम्ही त्यांना विविध प्रकारची ट्रीट दिलीत तरी जेवणाच्या वेळी व्यवस्थित खाऊ द्या.
संकलन- वेदांगी काण्णव, मुंबई विद्यापीठ
Post a Comment
You must be logged in to post a comment.